Gmail युजरने थेट CEO कडे मागितली मदत, म्हणाला – ‘पिचाई सर, Password कसा रिसेट करायचा ते मी विसरलोय, कृपया मदत करा’
नवी दिल्ली : वृत्त संस्था – जी-मेल अकाऊंट्सचा पासवर्ड विसरला. तर आपण फॉरगॉट पासवर्डचा वापर करून नवा पासवर्ड तयार करतो. त्यामुळे आपली अडचण काही मिनिटात दूर होते. जी-मेलचा पासवर्ड विसरल्यावर कोणी थेट कंपनीच्या सीईओशी संपर्क साधत नाही. पण एका जीमेल युजर्सने आपली समस्या थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना सांगितली अन् मदतीचे आवाहन केले आहे. या व्यक्तीला पिचाईंनी उत्तर दिले नाही. मात्र अन्य वापरकर्त्यांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिविर, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जगभरातून भारतासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुंदर पिचाईंनी भारतासाठी मदतीची घोषणा केली. त्यांनी ट्विट करून मदतीची माहिती दिली. त्यांच्या ट्विटला एका ट्विटर वापरकर्त्याने उत्तर दिले आहे. हॅलो सर, तुम्ही कसे आहात ? मला जीमेल आयडी पासवर्डबद्दल एक मदत हवी आहे. पासवर्ड कसा रिसेट करायचा ते मी विसरलो आहे. कृपया मदत करा, असे आवाहन @Madhan67966174 नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने केले आहे. मूळचे भारतीय असलेल्या सुंदर पिचाईंनी गुगलतर्फे भारताला 135 कोटींची मदत जाहीर केली आहे.