Women’s T20 Challenge : भारतीय महिला क्रिकेटपटू ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मिताली राजच्या संघाला धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएल 2020 च्या 13 व्या पर्वाने अर्धा टप्पा पूर्ण केला आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिलांच्या ट्वेंटी-20 चॅलेंजसाठी तीन संघांची नुकतीच घोषणा केली होती. मिताली राज, स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली या संघांची घोषणा करण्यात आली होती. मिताली राज व्हेलॉसिटी, स्मृती ट्रेलब्लेझर्स तर कौर सुपरनोवास या संघांचे नेतृत्त्व करतील. मात्र, मिताली राजच्या संघाला स्पर्धेपुर्वीच मोठा धक्का बसला आहे. मितालीच्या संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला 4 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून हे तीनही संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा यूएईमध्ये होणार असून 9 नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. महिलांच्या या स्पर्धेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशातील खेळाडूंचा समावेश आहे. तसेच थायलंडची नथ्थाकन चानथाम ही देखील या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे चानथाम ही चॅलेंज टी-20 स्पर्धा खेळणारी पहिली थाय खेळाडू ठरेल.

मिताली राजच्या संघातील खेळाडू मानसी जोशी हिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिच्या जागी उत्तर प्रदेशची गोलंदाज मेघना सिंग हिचे नाव सुचवण्यात आले असून बीसीसीआयच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. जोशी दोन आठवड्यांच्या आयसोलेशनमध्ये राहणार आहे. भारतीय खेळाडू मुंबईत 9 दिवस क्वारंटाईन कालावधीत आहेत. 21 ऑकटोबरला ते यूएईसाठी रवाना होणार आहेत. मात्र यामध्ये जोशीचा समावेश नसणार नाही.

स्पर्धेतील तीन संघ
1. सुपरनोवास –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज (उपकर्णधार), चामरी अटापटू, प्रिया पूनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला सिरिवर्दने, पूनम यादव, शकेरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकार, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका आणि मुस्कान मलिक

2. ट्रेलब्लेझर्स – स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, ऋचा घोष, हेमलता, नुजहत परवीन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झूलन गोस्वामी, सिम्रन दिल बहादूर, सलमी खातून, सोफी, चानथाम, डिएंट्रा डॉटीन आणि केशवी गौतम.

3. व्हेलॉसिटी – मिताली राज (कर्णधार) वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका विद्या, सुश्री दिब्यादर्शनी, मनाली दक्षिणी, केसपेरेक, डॅनियल वॅट, सुन लुस, जहांआरा आलम आणि एम. अनागा.

चार सामन्यांची मालिका
या स्पर्धेत एकूण चार सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील तीन सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होतील. तसेच स्पर्धेतील दुसरा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. 4 नोव्हेंबरला सुपरनोवाज विरुद्ध व्हलॉसिटी या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. 5 नोव्हेंबरला दुसरा सामना व्हेलॉसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स यांच्यात होईल. 7 नोव्हेंबरला ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज यांच्यात होईल आणि 9 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.