मुंबईसह राज्यात जोरदार पावसाला सुरुवात

आज दुपारी ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकणार, गोव्यात १२५ मिमी पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या कहरला तोंड देत असतानाच मुंबईला आज ‘निसर्ग’ चक्रीवादळाला तोंड द्यावे लागणार आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाचे आता तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलीबाग ते दमण दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण व आजबाजूच्या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गोव्यात आज सकाळी साडेसात वाजेपर्यंत १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी साडेसहा वाजता हे चक्रीवादळ अलिबागपासून १४० किमी, मुंबईहून १९० किमी आणि सुरतहून ४१५ किमी दूर होते. ते ताशी १२ किमी वेगाने किनार्‍याच्या दिशेने सरकत आहे.

 

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर राहणार्‍या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह सर्व किनारपट्टीवर एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील किनार्‍यालगतच्या गावांमधील लोकांना हलविण्यास सुरुवात केली आहे.

 

मुंबईत नौदलाचा तळ असून चक्रीवादळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नौदल सज्ज झाले आहे. तटरक्षक दल, मुंबई अग्निशमन दलासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सज्ज आहे. मुंबईत कोणालाही समुद्र किनार्‍यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

चक्रीवादळ किनार्‍यावर धडकेल, त्यावेळी वार्‍याचा वेग ताशी ११० किमी असणार आहे, या प्रचंड वार्‍यामुळे झाडे, खांब कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळाच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. झाडे आणि खांब याच्याखाली उभे राहू नये, अशी सूचना महापालिकेने केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉस्पिटल व कोविड -१९ रुग्णालयांना जनरेटर कार्यान्वित ठेवण्यास सांगितले आहे. चक्रीवादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाला तर पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.