‘मी फोनचा CDR मिळवला, माझी खुशाल चौकशी करा’; फडणवीसांचे ठाकरे सरकारला ‘ओपन चॅलेंज’

मुंबई :- मनसुख हिरेन प्रकरणावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या प्रकरणाचा तपास एटीएस (ATS) करत असून, तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सचिन वाझे (Sachin Waze) यांना गृहमंत्रीच पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. तसेच मी फोनचा सीडीआर (CDR) मिळवला आहे, माझी खुशाल चौकशी करा, असं ओपन चॅलेंज फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले.

मनसुख हिरेन प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज निवेदन सादर केले. यावेळी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावर खुलासा करत गृहराज्यमंत्री प्रफुल्ल खाेडा पाटेल यांच्या नावाचा उल्लेख केला. या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे, जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांचा जोरदार आक्षेप

यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. फडणवीस म्हणाले, एखाद्या व्यक्तीला किती मागे घालावे. सचिन वाझेंचा राजीनामा नाही, वाझे कोणत्या पक्षाचे आहेत ? वाझेला निलंबित करा. कारवाई करणे नाही म्हणजे वाझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देण्यासारखे असून, वाझे यांना निलंबित करा, हा खरा चेहरा दिसतोय, असा आरोप फडणवीसांनी केला. यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

त्यांना सीडीआर मिळवण्याचा काय अधिकार ?

विरोधी पक्षाकडे सीडीआर कुठून आला, त्यांना काय अधिकार आहे, विरोधी पक्षनेत्यांना सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, होय, मी सीडीआर मिळवला माझी चौकशी करा, पण जे खुनी आहेत त्यांची चौकशी करा. आम्हाला धमक्या देताय का ? खुनी मिळाला नाही तर त्या पलीकडचीही माहिती काढेन, असे खुलं आव्हानच फडणवीसांनी दिले.