मनसुख हिरेन प्रकरणाचे गूढ आणखी वाढले; पीपीई किटमधील चालक अन् बदलले ‘लोकेशन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी काही दिवसांपूर्वी आढळली होती. त्यानंतर या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे. आता या प्रकरणाची चौकशी एनआयएकडून केली जात आहे. त्यामध्ये पीपीई किटमधील चालक आणि मनसुख हिरेन यांनी शेवटच्या क्षणी लोकेशन बदलले यावर तपास सुरू आहे.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्याचे दहशतवादविरोधी पथक यांनीदेखील स्फोटकांनी भरलेली गाडी नेमकी कुठून आली. या सगळ्या कारस्थानामागे नेमका कोणाचा हात होता, याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन गाड्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी आल्या असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून निष्पन्न झाले. मात्र, इनोव्हा गाडीच्या चालकाने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट वापरल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन हे 17 फेब्रुवारीला ओला कॅबने क्रॉफर्ड मार्केटला जाण्यास निघाले होते. त्यावेळी त्यांनी शेवटच्या क्षणी लोकेशन बदलले होते. त्यानुसार, क्रॉफर्ड मार्केटला जाण्यासाठी कॅबचालक उजवीकडे वळणार होता. मात्र, हिरेन यांनी त्यांना गाडी सरळ घेण्यास सांगितले. त्यानंतर ते सीएसएमटी स्थानकाजवळ असलेल्या शिवाला हॉटेल परिसरात उतरले.