Mansukh Hiren Case : क्रिकेट बुकीनं API सचिन वाझेंना मिळवून दिले होते 5 बेनामी SIM कार्ड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली असताना दुसरीकडे एटीएसने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलिस विनायक बाळासाहेब शिंदे (वय-51) आणि बुकी असलेला नरेश रमणीकलाल गोर (वय-31) यांना महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. तपासादरम्यान क्रिकेट बुकी असलेल्या नरेश गोर याने गुन्ह्यासाठी 5 बेनामी सिमकार्ड मुख्य आरोपी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना उपलब्ध करुन दिल्याचे तपासात समोर आले आहे.

 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा 5 मार्च रोजी मुंब्रा येथील रेतीबंदर येथे मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत असताना खात्रीलायक माहितीवरुन एटीएसने पाळत ठेवून नरेश गोर आणि विनायक शिंदे यांना अटक केली. विनायक शिंदे हा निलंबित पोलीस कर्मचारी आहे.

आरोपी विनायक शिंदे याला 2007 मध्ये वर्सोवा येथे झालेल्या लखनभैय्या कथित चकमक प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 2020 पासून शिंदे पॅरोलवर आहे. रजेवर आल्यानंतर त्याचा संपर्क सचिन वाझे यांच्यासोबत झाला. त्यानंतर त्याने वाझे यांना बेकायदेशीर कामात मदत करू लागला. मनसुख हिरेन कटात आणखी कोणी सहभागी आहेत का, या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार कोण आहे, याचा तपास एटीएस कडून करण्यात येत आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.