मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : NIA चे मिठी नदीपात्रात सर्च ऑपरेशन ! लॅपटॉप, सीपीयू, प्रिंटर, नंबर प्लेट्स मिळाल्या, मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करणाऱ्या NIA ने रविवारी (दि. 28) बांद्रा कुर्ला कॉंम्पलेक्स परिसरातील मिठी नदीपात्रात शोध मोहीम राबवली. यावेळी नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य मिळाले आहे. त्यामुळे एनआयएच्या हाती आता या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, एनआयएने या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केली असून, दुसऱ्यांदा न्यायालयाने एनआयएकडे ताबा दिलेला आहे.

रविवारी दुपारी एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीपात्रात शोध मोहिमेसाठी पोहचली होती. यानंतर काही जण नदीपात्रात उतरले व मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर मशीन, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेट्स शोधून काढल्या. या अगोदर एनआयएची टीम वाझेंना घेऊन वांद्रे परिसरातील खाडीजवळ तपासासाठी आली होती. यावेळी एनआयएचे एसपी विक्रम खलोट हे देखील उपस्थित होते. दरम्यान अटकेत असणारे सचिन वाझे यांनी एनआयला मनसुख हिरेन यांचा मृतेदह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याकडील पाच मोबाईल नष्ट केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांचा कार्यालयीन मोबाईलही होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाझे 13 मोबाईल वापरत होते. वाझेंच्या कार्यालयीन मोबाईलमधील डाटा मिळवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत असून यासाठी काही तज्ञांची मदत घेतली जात आहे. हिरेन प्रकरणी मोबाईलमधून अनेक पुरावे हाती लागण्याची एनआयएला शक्यता वाटत आहे.