NIA नं अटक केलेले पोलिस निरीक्षक सुनील माने सध्या सशस्त्र दलात होते कार्यरत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NIA ने सचिन वाझे, रिजाझुद्दीन काजी त्यानंतर मुंबई पोलीस विभागातील तिसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सध्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर चौकशीसाठी पतीला बोलावलं म्हणून गेले ते परत आलेच नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, मनसुख हत्येचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत असताना युनिटमध्ये गेल्या महिन्यात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे.

सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना ११ एप्रिलला NIA कडून अटक करण्यात आली. अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. काजी यांची अनेक वेळा एनआयए अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने काझी यांची चौकशी सुरु केली होती. सचिन वाझे याचा सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने कटात सामील असल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

रियाजुद्दीन काझी हे २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी २०१० सालच्या १०२ व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली.