मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन आलं समोर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हिरेन यांचे शेवटचे मोबाइल लोकेशन कोठे याचा तपास केला असता त्यांना बुधवारी रात्री १०.३० वाजता शेवटचे लोकेशन वसईतील एका गावात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हिरेन वसईत का गेले अन् कोणाला भेटायला गेले होते, असे विविध प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत एक स्कॉर्पिओ आढळली होती. त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी मुंब्य्रात सापडला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान हे प्रकरण गुंतागुंतीचे होऊ लागले असून या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नव्याने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम बँचकडून शनिवारी एटीएसकडे वर्ग करण्यात आला. हिरेन यांचा ज्या ठिकाणी मृतदेहा मिळून आला तो मुब्रा खाडी परिसर आणि पेडर रोड येथील अँटिलिया बंगल्याचा परिसर पिंजून काढला जात आहे त्याच बरोबर तपासासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली असून त्यांच्याद्वारे संशयास्पद बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. एटीएसचे जयजीत सिंह यांनी घटनास्थळी जाऊन सर्व माहिती घेतली. मृत मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाची पाहणी करून त्याबाबत सूचना केल्या.

मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवालात त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा नसल्याचे नमूद आहे. त्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूचे गूढ कायम आहे. एटीएसच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हिरेन यांच्या मोबाइलवर आलेल्या कॉल्सच्या सीडीआरद्वारे पडताळणी केली जात असून संबंधितांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडल्यानं हिरेन यांची चौकशी
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक भरलेली गाडी ही मनसुख हिरेन स्पष्ट झाल्याने तपास यंत्रणांकडून त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. वारंवार होणारी चौकशी त्याचबरोबर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून सततची होणारी विचारणा यांमुळे हिरेन त्रासले होते. त्यांनी यांदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यानी एटीएसचे २-३ पोलीस २५ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता माझ्या घरी आले. तुमची स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक भरलेल्या अवस्थेत सापडल्याचं त्यांनी सांगितलं. हे समजल्यानंतर मला धक्काच बसला. एटीएसच्या पोलिसांनी चौकशी केली आणि ते निघून गेले. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याचे ४-५ पोलीस रात्री पावणे अकराच्या सुमारास घरी आले आणि चौकशी करुन निघून गेले. विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस २६ फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजता माझ्या घरी आले आणि मला घेऊन गेले. सकाळी ६ पर्यंत त्यांनी मला ताब्यात ठेवलं आणि त्यानंतर घरी सोडलं.

त्यानंतर २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विक्रोळी पोलीस, त्यानंतर दुपारी ३ वाजता घाटकोपर पोलीसानी चौकशी केली तसेच १ मार्चला संध्याकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसचा फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. वारंवार तेच ते प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. पोलीस सहआयुक्त भाम्रे यांनी चौकशी केली. विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे. दुसरीकडे बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत. एका पत्रकारानं फोन करुन या प्रकरणात मी संशयित असल्याचं सांगितलं. या पत्रातून मनसुख यांनी माझी आणि माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी पत्रातून केली. दरम्यान, या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं नमूद केलं आहे.