मंत्रालयात एकाच विभागातील 8 कर्मचार्‍यांना ‘कोरोना’चा संसर्ग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अशातच प्रशासकीय आणि महत्वाच्या मानल्या जाणार्‍या मंत्रालयामध्ये महसूल विभागातील 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच याच विभागातील आणखी 8 ते 9 जणांना ताप, थंडी, खोकला आदीची लक्षणे असल्याचे समजते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आगामी काही दिवसात मंत्रालयात पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवेशाला देखील मर्यादा घालण्याचा विचार सुरु असल्याचे एका वरीष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

राज्यात पुढील काही दिवस धार्मिक सामाजिक-राजकीय कार्यक्रम, जत्रा-यात्रा रद्द करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादीेचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे मार्च 1 पर्यंत सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यातच राज्यात गेल्या तीन दिवसांमध्ये चार कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान राज्यात मागील आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या साधारण दोन हजाराच्या आसपास होती. पण काल एका दिवसात 7000 हजार नव्याने रुग्ण आढळले आहेत.