ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी : पुणे जिल्ह्यात ४ हजार ९०४ जागांसाठी, ११ हजार ७ उमेदवार रिंगणात !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असून, पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. ४ हजार ९०४ जागांसाठी ११ हजार ७ उमेदवार रिंगणात आहेत. ८१ जागा बिनविरोध झाल्या असून ६५० जागांसाठी चुरशीच्या लढती होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीचा ज्वर वाढणार आहे. ४ तारखेला अर्ज माघारीच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या 746 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम निवडणूक जाहीर केला होता. जवळपास २१ हजार ३५८ उमेदवारांनी २१ हजार ७७१ अर्ज दाखल केले होते. यातील ८ हजार ७७८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे 650 ग्रामपंचायतीच्या निवडणूक 15 तारखेला होणार आहे. यात 2 हजार 31 प्रभागात 4 हजार 904 जागांसाठी 11 हजार 7 उमेदवार रिगणात उभे आहेत.

माळेगाव ग्रामपंचायत येत्या काही दिवसात नगरपालिका होणार असल्याने सर्व उमेदवारांनी एकत्र येत निवडणूक खर्च टाळण्यासाठी अर्ज मागे घेतल्याने येथील निवडणूक होणार नाही. 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे. प्रचारासाठी आता केवळ 9 दिवस उरले आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होणार आहे. अनेक ग्रामपंचायतीत गटातटाच्या राजकारनामुळे चुरस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याने गाव कारभाऱ्याचा निवडीचा फड यंदा चांगलाच रंगणार आहे.

हायटेक प्रचारावर राहणार भर-
ग्रामपंचायतीतही यंदा हायटेक प्रचारावर उमेदवाराचा भर राहणार आहे. फेसबुक, व्हाट्स अँप, इन्स्टाग्राम या सारख्या समाज माध्यमांवर यापूर्वीपासूमच उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. या सोबतच आपली कामे मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी आधुनिक माध्यमाचा वापरही उमेद्वारांतर्फे केला जाणार आहे. शिरूर तालुक्यात 1148, दौंड तालुक्यात 1172, बारामती 1013, खेड मध्ये 1111तर इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 1355 उमेदवार निवडणूक रिगणात आहेत.

पुरंदरमधील पिंगोरीचा निवडणुकीवर बहिष्कार-
गावात विकासकामे होत नसल्याच्या कारणावरून बिनविरोधाच्या वाटचालीवर असलेल्या पिंगोरी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या निवडणुकीत बहिष्कार घालणारी एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. गावातील दोन महत्त्वाच्या रस्त्याची कामे आमदार खासदारांनी आश्वासने देऊनही पूर्ण केली नाहीत. तसेच गाव अनेक सुविधांपासून वंचित असल्याने ग्रामस्थांनी अर्ज माघारीच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे.