अबब ! मेगा भरती प्रक्रिया, 32 हजार पदांसाठी तब्बल 32 लाख अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 31 हजार 888 पदांसाठी जवळपास 32 लाख अर्ज प्राप्त झाले आहे. म्हणजेच एका पदासाठी जवळपास 100 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

ग्राम विकास विभागात पदांच्या भरतीसाठी 11 लाख अर्ज –
ग्राम विकास विभागात 13 हजार 514 जागा रिक्त आहेत. या पदासाठी तब्बल 11.2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. वनरक्षक पदांसाठी 448 पदे रिक्त आहेत. पशुधन विभागात 729 पदे रिक्त आहेत. या विभागात प्रत्येक पदासाठी जवळपास 452 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर इतर रिक्त पदांसाठी 900 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती परंतू या पदांसाठी जवळपास 4 लाख अर्ज आले आहेत.

लोकसभा निवडणूकी आधी 72 हजार पदांसाठी मेगा भरती –
इतर विभागांसाठी आलेल्या अर्जांची संख्या लाखाच्या घरात आहे. राजस्व विभागात 1 हजार 802 पदांसाठी 5.6 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्य विभागात 5 हजार 778 पदांसाठी 4.2 लाख तर अर्थ विभागात 932 पदांसाठी 1.74 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यात ज्युनिअर अकाऊंटंट आणि क्लार्क पदांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज्य सरकारने 72 हजार पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवली होती, परंतू मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती.