उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा, भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत पुनरागमन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. कोरोना संसर्ग, मराठा आरक्षण, पावसामुळे झालेले नुकसान अशा मुद्द्यांवर वातावरण तापलं असताना राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.

मागील अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते नाराज आहेत. ते राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असून, याच भागातून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. या नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यास कितपत फायदा पक्षाला होऊ शकतो. यासंदर्भात राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरु आहे. सध्या अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात महत्वाची बैठक सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

जोपर्यंत भाजप नेते पक्षात प्रवेशाची अधिकृत घोषणा करत नाहीत. तोपर्यंत पक्षात नेत्यांबरोबर चर्चा करणार नसल्याची, भूमिका राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सध्या वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तसेच त्यांच्या सोबत चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नियुक्त्या देखील करण्यात आल्या.