पुण्यात इमारती कोसळण्याच्या घटना अनेक, कारवाई मात्र शून्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या भागात इमारत कोसळणे, त्यात लोकांचा मृत्यु होण्याच्या घटना घडत असतात. त्यात अनेक कामगारांचा मृत्यु होतो. मात्र, त्यातील दोषींवर काहीही कारवाई झाल्याचे आजवर दिसून आले नाही.

मुंढव्यातील केशवनगरमध्ये २० जुलै २०१८ मध्ये एक दुमजली इमारत कोसळली होती. त्यात एका कुटुंबातील काही जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशामक दलाच्या जवानांना त्यांना बाहेर काढण्यास यश आले होते.

आंबेगावमधील भुमकर मळा येथे बांधकाम सुरु असलेली पाच मजली इमारत कोसळून त्यात एक जणांचा मृत्यु झाला होता. अपूर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतीमध्ये काही कुटुंबं रहात होती. ऑक्टोंबर २०१४ मध्ये या इमारतीला तडा जाऊन ती काहीशी झुकली होती. त्यामुळे आतमध्ये राहणारी कुटुंबे आधीच इमारतीतून बाहेर आल्याने मोठा अपघात टळला होता.

बालेवाडी येथे इमारतीचा स्लॅब कोसळून १० मजूरांचा मृत्यु झाला होता. ही घटना २९ जुलै २०१६ रोजी घडली होती. बालेवाडी मैदानाजवळील पार्क एक्सप्रेस या इमारतीचे काम सुरु असताना अचानक १४ व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. तेथे काम करणारे सर्व मजूर १४ व्या मजल्यावरुन खाली पडले व त्यांचा जागीच मृत्यु झाला होता. हे सर्व मजूर परप्रांतीय होते. यात बिल्डरांपासून कंत्राटदारापर्यंत सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांना तातडीने जामीन मिळाला. प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
दत्तवाडीतील नवश्या मारुतीजवळील पाटे डेव्हलपर्सच्या सैया या इमारतीचे काम सुरु असताना ऑक्टोंबर २०१७ रोजी १० व्या मजल्यावर काम करत असताना स्लॅब कोसळून चार जण वरुन खाली पडले. त्यातील तिघांचा मृत्यु झाला होता.

सहकारनगरमधील तळजाई पठारावरील चार मजली इमारत कोसळून त्यात १३ जणांचा मृत्यु झाला होता. ही घटना २५ सप्टेंबर २०१२ मध्ये घडली होती. या बेकायदा इमारतीचे मालक काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय नांदे यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. येथील बांधकामाचा ठेकेदार लहू सावंत यालाही नंतर अटक करण्यात आली होती. या दुर्घटनेने पुणे शहराला मोठा धक्का बसला होता.

पुण्यात अशा अनेक दुर्घटना घडल्या असल्या तरी त्यांना जबाबदार असलेल्यांना शिक्षा झाल्याचे अजून तरी घडलेले नाही. दुर्घटना घडल्यानंतर काही दिवस त्याची चर्चा होते. त्यानंतर सर्व विस्मरणात जाते. महापालिका आणि इतर यंत्रणा नेहमीप्रमाणे पुन्हा बेकायदा बांधकामाकडे दुसरी घटना घडेपर्यंत दुर्लक्ष करत राहतात.

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …