नवदांपत्यांचा हिरमोड; ‘व्हॅलेंटाइन डे’ रविवारी आल्याने लग्नगाठ नाहीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अलीकडच्या काळामध्ये रजिस्टर विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. मध्यतरीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक गणिते बिघडली. त्यामुळे रजिस्टर विवाह करण्याकडे कल वाढला आहे. या पद्धतीने विवाह करत असताना ज्या दिवसाला पसंती दिली जाते तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. मात्र यावर्षी रजिस्टर विवाह करण्याचा मुहूर्त हुकणार आहे. कारण यंदाचा व्हॅलेंटाइन डे रविवारी आल्याने अनेक नवदांपत्यांच्या पदरी निराशा पडली असून अनेक जोडप्यांनी सोमवारी व मंगळवारी विवाह नोंदणीसाठी लगीनघाई करण्यास सुरूवात केली आहे.

अलीकडे साधे पद्धतीने लग्न करताना अवघ्या काही रुपयांत विवाह नोंदणीचे सोपस्कार पार पडतात. मात्र अनेक जण मुहूर्त पाहूनच विवाह नोंदणी कऱण्यास पसंती दर्शवतात. जानेवारीपासून विवाह सोहळे मोठ्या संख्येने सुरु झाले आहे. मकरसंक्रातीपासून पौष महिन्याला सुरूवात झाली आणि अनेकांना नाईलाजास्तव विवाह मुहूर्तासाठी फेब्रुवारीपर्यंत थांबावे लागले. त्यातही अनेकांनी काढीव मुहूर्तावर लग्न उरकले. मात्र अनेकांनी व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर लग्न करण्याचा निश्चय केला होता. एवढे सगळे करूनही व्हॅलेंटाईन डे रविवारी आल्याने विवाह नोंदणी कार्यालय बंद असते .त्यामुळे अनेकांनी सोमवारी आणि मंगळवारी लग्नाची नोंदणी करत असल्याचे सांगितले.

मुंबई शहराच्या विवाह नोंदणी अधिकारी मीना आंबिलपुरे म्हणाल्या की, फेब्रुवारी महिन्यात १४ फेब्रुवारी ही तारीख अनेक दाम्पत्यांना विवाह नोंदणीसाठी हवी असते, फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांत पौष महिन्यामुळे फक्त ५० लग्नांची नोंदणी झाली आहे. याउलट माघ महिन्याच्या पहिल्याच दिवशी १३ विवाहांची नोंदणी झाली आहे. सोमवारी, १५ फेब्रुवारीला एकाच दिवशी १३, तर मंगळवारी, १६ फेब्रुवारीला १४ दाम्पत्यांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. मुंबई उपनगरातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते.पहिल्या दोन आठवड्यांत दररोज सरासरी १० ते १२ विवाहांची नोंदणी होत होती. मात्र शुक्रवारी १८ लग्न पार पडली असून सोमवारसाठी ५० आणि मंगळवारसाठी ४० दाम्पत्यांनी विवाह नोंदणीसाठी वेळ घेतल्याचे विवाह नोंदणी अधिकारी शरयू सावंत यांनी सांगितले.