ऑनलाइन शिक्षण पद्धतीत अनेक दोष, गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहाण्याचा धोका, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक पालकांना ऑनलाइन शिक्षण पध्दत आर्थिक कारणाने परवडत नसल्याने त्यांचे पाल्य शिक्षणापासूनच वंचित राहाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ऑनलाइन शिक्षण पध्दतीत अनेक दोष असून आता मुख्य मंत्र्यांनीच त्यात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोना साथीमुळे संपूर्ण देशातील शिक्षण पद्धतीवर परिणाम झाला. नाईलाजाने ही ऑनलाइन शिक्षण पद्धती शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना स्वीकारावी लागली. सुरुवातीपासूनच या पद्धतीत अनेक दोष दिसून आले आहेत. सध्या वेतन कपात किंवा नोकऱ्या गमवाव्या लागल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी स्मार्ट फोन अथवा लॅपटॉप स्वतंत्रपणे उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. काही विद्यार्थी आपल्या पालकांचेच स्मार्ट फोन वापरतात किंवा ज्यांना लॅपटॉप अजिबातच उपलब्ध होऊ शकत नाही असे विद्यार्थी शिक्षणापासूनच वंचित राहू लागले आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळेही शिक्षणात अडचणी येत आहेत. इंटरनेट कनेक्शनसाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महिन्याला दोनशे ते पाचशे रुपये होणारा खर्च पालकांना परवडणारा नाही. याखेरीज अनेक शिक्षक, शिक्षिका ऑनलाइनचे तंत्र सहजपणे हाताळू शकत नाहीत. ऑनलाइन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे अवघड होते असा अनुभव अनेक शिक्षकांनी सांगितला. याकरिता ऑनलाइन पद्धतीतील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण यात आपण तातडीने लक्ष घालावे आणि योग्य तो तोडगा काढावा असे आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.