रेल्वे बंदमुळे अनेकांवर नोकर्‍या गमाविण्याचे संकट !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रोजगारासाठी पुणे-मुंबईदरम्यान रोजचा प्रवास करणारा नोकरदार वर्ग हवालदिल झाला आहे. लॉकडाउनमुळे रेल्वे बंद असल्याने पुण्यातून मुंबईत नोकरीवर जाणे शक्य नाही. सुरुवातीच्या काळात घरून काम करण्याची सवलत देणार्‍या कार्यालयांकडून आता नोकरीवर हजर होण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे विचित्र कात्रीत सापडलेल्या हजारो व्यक्तींच्या नोकर्‍या संकटात सापडल्या आहेत.

लॉकडाउन झाल्यानंतर रेल्वे बंदबरोबरच कार्यालये बंद होती. त्यानंतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील कामगारांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. या दोन्ही टप्प्यांमध्ये कोणतीही अडचण जाणवली नाही. पण आता बहुतांश कार्यालयांचे कामकाज पूर्ववत करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेत प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहावे लागत आहे. सर्वच कामगारांना आळीपाळीने कामावर बोलावले जात आहे.

पुण्यातून मुंबईत नोकरीसाठी जाणार्‍या नोकरदारांनाही आता कामावर रुजू होण्याच्या सूचना कार्यालयांनी दिल्या आहेत. रेल्वे बंद आणि मुंबईतील कोरोनाचे संकट आणि विलगीकरणाची प्रक्रिया आदी सर्व गोष्टींच्या अडचणी असल्याने नोकरीवर तातडीने हजर होणे शक्य नसल्याचे नोकरदार मंडळींकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आता मुंबईत निवासी राहा, अशाही सूचना काहींना केल्या जात आहेत.

पुणे शहरात राहून मुंबईत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जाणार्‍यांची संख्या 10 ते 12 हजारांच्या आसपास आहे. मंत्रालय, उच्च न्यायालय, सरकारी- खासगी बँका, शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये ही मंडळी नोकरी करतात. पुण्यातून सकाळी निघणार्‍या डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस आदी गाडयांमधून प्रामुख्याने नोकरदार मंडळी आणि व्यावसायिक मुंबईत पोहोचतात. मुंबईतूनही पुण्यासाठी संध्याकाळी गाडया धावतात. या दोन्ही गाडयांच्या माध्यमातून सकाळी कामावर हजर होऊन नोकरदार रात्री पुण्यात घरी पोहोचतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रवास सुरू होता. मात्र, रेल्वे बंद झाल्याने त्यात खंड पडला आहे.