विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा ‘प्लान B’ ?

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलं आहे. पक्षांतरावर उपाय म्हणून उमेदवार असावेत याचा बी प्लान राष्ट्रवादीनं तयार केला आहे. विधानसभेला उमेदवार कोण असावेत याची राष्ट्रवादीने चाचपणी सुरु केली आहे. नवे उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या काही नेत्यांना कामाला लावले आहे.

हे असू शकतात उमेदवार

माढा मतदारसंघ
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे शिवसेनेत गेल्यास आघाडीच्या शिवाजी कांबळे यांना तिकीट दिले जाऊ शकते.

करमाळा मतदारसंघ
करमाळा मतदारसंघ येथील राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संजयमामा शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत.

माळशिरस मतदारसंघ
माळशिरस मतदारसंघातील मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर या जागेवर राष्ट्रवादी नेते अजूनही उमेदवाराच्या शोधात आहेत.

सातारा मतदारसंघ
साताऱ्यात राष्ट्रवादीत गोंधळाचे वातावरण आहे. साताऱ्यातून जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांना उमेदवारी मिळू शकते.

उस्मानाबाद मतदारसंघ
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील आमदार राणा जगजीतसिंह पाटील भाजपमध्ये गेले तर शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकरांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाऊ शकते.

अक्कलकोट मतदारसंघ
अक्कलकोट मतदारसंघात माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे हे भाजपमध्ये गेले तर नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ स्वामींना काँग्रेसकडून तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे.

बार्शी मतदारसंघ
बार्शी मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाणार आहेत त्यांच्याऐवजी माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील किंवा भाजपचे राजा राऊत यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

पंढरपूर मतदारसंघ
पंढरपूर मतदारसंघातून विद्यमान कॉंग्रेस आमदार भारत भालके भाजपमध्ये गेल्यास गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेले उद्योजक समाधान आवताडे यांना कॉंग्रेस आघाडीकडून तिकीट देण्याचा विचार केला जाईल.

फलटण मतदारसंघ
फलटण मतदारसंघात रामराजे निंबाळकर यांच्याऐवजी दिगंबर आगवणे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

कराड मतदारसंघ
कराडचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील भाजपमध्ये गेल्यास धैर्यशिल कदम यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. काँग्रेसच्या जयकुमार गोरेंनी पक्ष सोडल्यास त्याऐवजी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशम यांना याठिकाणी उमेदवारी दिली जाऊ शकते.

इंदापूर मतदारसंघ
इंदापूर मतदारसंघात आघाडीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात फारसे पटत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील यांना डावलले जाऊ शकते. हर्षवर्धन पाटील सध्या भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत अशीही चर्चा सध्या सुरु आहे. राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे विद्यमान आमदार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like