दौंडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा धक्का ! आ. कुल यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. तालुक्यातील अनेक छोट्यामोठ्या गावांमधून राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत असून काल गुरुवारी आलेगाव, हिंगणी बेर्डी, देऊळगाव राजे येथील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून धक्का तंत्र देणाऱ्या राष्ट्रवादीला स्वतःच मोठ मोठ्या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राजाभाऊ तांबे यांचा भाजप प्रवेश झाला होता त्यांनतर काही दिवसांतच आनंद थोरात, महेश भागवत यांचा प्रवेश झाल्याने राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले होते.

काही दिवसांपूर्वी स्वामी चिंचोली, मलठण, गिरीम या गावांतील कुल गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्याला राष्ट्रवादीने मोठे महत्त्व दिले होते परंतु काही दिवसांतच त्या कार्यकर्त्यांनीही पुन्हा कुल गट म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना अक्षरशा तोंडघशी पाडले होते.

दौंड तालुक्यातील पूर्वभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपच्या या धक्कातंत्राने डोकेदुखी वाढली असून अनेक ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा फटका बसत आहे.

Visit : Policenama.com