आंध्रप्रदेशमध्ये 61 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली, 11 जणांचा मृत्यू तर 26 जण बेपत्‍ता, 23 सुखरूप

अमरावती (आंध्र प्रदेश) : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपटनाममधील गोदावरी नदीत रविवारी मोठा बोटीचा अपघात झाला. गोदावरी नदीत पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली. अपघात झाल्यानंतर आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर 26 जण बेपत्‍ता आहेत.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार या नावातील प्रवाशांपैकी २३ प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. बोटीत ६१ प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तथापि अपघाताची संपूर्ण माहिती आणि क्रॅश फेरीमध्ये बसलेल्या प्रवाशांची नेमकी संख्या सध्या माहिती नाही. सात जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. बाकीचे शोधण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ) आणि एसडीआरएफच्या टीम्स मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. पूर्व गोदावरी (गोदावरी) जिल्हा पोलिस अधीक्षक अदनान अस्मी यांनी याबाबत माहिती दिली.

अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई:

आंध्र प्रदेश सरकारने अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सरकारमधील मंत्री अवंती श्रीनिवास तसेच जिल्ह्यातील उपस्थित मंत्र्यांना घटनास्थळी पोहचण्यास आणि मदतकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बोलून अपघाताची माहिती घेतली.

युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे आदेश :

अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या अपघाताविषयी सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर अपघातांबाबत तज्ज्ञ समितीच्या मतानुसार सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी ओएनजीसी आणि नेव्ही हेलिकॉप्टर वापरुण तात्काळ मदत पुरवण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रभागात सर्व नौका चालकांचा परवाना तपासण्याचे आदेश दिले आहेत. बोटीची वैधता व वाहतुकीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बोटीचा परवाना तपासण्याचे व बोटी चालविणाऱ्या खलाशांना आवश्यक प्रशिक्षण दिले गेले आहे की नाही याची तपासणी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

बोटीवर १२० लाइफ जॅकेट्स होती उपलब्ध :
पोलिस सूत्रांनी सांगितले सांगितलेल्या माहितीनुसार या बोटीची क्षमता ९० जणांची होती. तसेच, १२० लाइफ जॅकेट्स देखील त्यावर हजर होते. परंतु किती पर्यटकांनी लाइफ जॅकेट परिधान केले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. आंध्रमधील पूरसदृश परिस्थितीनंतर सध्या पूर्व गोदावरी नदीत पाण्याचे प्रमाण सध्या खूप जास्त आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत पाण्याची पातळी किंचित कमी झाल्यावरच नदीतील प्रवाश्यांसाठी फेरी सेवा पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती.

You might also like