देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘अंदर की बात’, म्हणाले- ‘येत्या काळात अनेक लोकं भाजपमध्ये येणार’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Jayant Patil) यांनी अशी वक्तव्ये केली आहेत की, भाजपमधील अनेक आमदार महाविकास आघाडीत येणार आहेत. परंतु यावर बोलताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत असल्याचं सांगितलं म्हटलं आहे. भाजपमधून कुणीही कुठेही जाणार नाही उलट भाजपमध्येच अनेकांचा पक्ष प्रवेश होणार असं भाकितही त्यांनी केलं आहे. नाशिकमधील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या काळात अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. काहीजण रोज वावड्या उठवतात की, भाजपचे लोक आमच्याकडे येणार आहेत. परंतु कुणीही त्यांच्याकडे जाणार नाही. त्यांच्याच पक्षातील नाराज आमदारांना संकेत देण्यासाठी या पुंग्या वाजवल्या जात आहेत.

पुढं बोलताना ते म्हणाले, तिन्ही पक्षात अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळं त्यांना दिलासा मिळावा म्हणून असं बोललं जात आहे. सर्वांना माहित आहे की, देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा युपीए नाही. तर या देशाचं भविष्य आणि वर्तमान नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळं एखादं धोक्यानं आलेलं सरकार किती काळ चालतं, कसं चालतं याची सगळ्यांना आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढावं ही तर माझीच इच्छा आहे.

काय म्हणाले होते अजित पवार आणि जयंत पाटील ?

अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत गौप्यस्फोट करत सांगितलं की, येत्या 4 महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणारही नाही. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनीही असं म्हटलं होतं की, भाजपमध्ये 10 पेक्षा जास्त आमदार नाराज असून राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे.