गाड्यांची संख्या अनेक, विमा मात्र एक 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकापेक्षा अधिक वाहनांचे मालक असणाऱ्यांसाठी स्वतंत्र ‘कम्पलसरी पर्सनल अॅक्सिडेंट’ विमा संरक्षण (सीपीए) घेण्याची आवश्यकता भासणार नाही. विमा नियामक ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्ललपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात ‘इर्डा’तर्फे नुकतेच या विषयी परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे एकपेक्षा अधिक वाहने बाळगणाऱ्यांच्या पैशात लवकरच मोठी बचत होणार आहे. एक जानेवारीपासून खरेदी करण्यात येणाऱ्या वाहनांना हा नियम लागू होणार आहे.

एको जनरल इन्शुरन्स’चे प्रमुख (प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी) अनिमेश दास म्हणाले की,’सध्या प्रत्येक वाहनधारकाला वार्षिक साडेसातशे रुपयांचा प्रीमियम भरून १५ लाख रुपयांचे संरक्षण देणारा विमा घ्यावा लागतो. त्यामुळे संबंधित वाहनधारकातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनावेळी त्याला नव्याने विमा उतरवणे भाग पडते. त्यामुळे त्याच्याकडे एकापेक्षा अधिक वाहने असतील तर, नव्या नियमानुसार त्याला एकदाच विमा भरून सर्व लाभ घेता येणे शक्य आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक नव्या वाहनाच्या इन्शुरन्सपोटी द्यावे लागणारे साडेसातशे रुपये वाचणार आहेत. नव्या बदलांचा समावेश असणारे परिपत्रक इर्डातर्फे सर्व विमा कंपन्यांना पाठविण्यात आले असून, एक जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.’

वैयक्तिक अपघात विमा 
वाहन विम्यासह वैयक्तिक अपघात विमा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर वाहन विमा आणि चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना असेल तरच तो कोणत्याही अनुचित अथवा अपघाताच्या प्रसंगी त्याला विमा संरक्षण मिळते. हे संरक्षण चालक आणि वाहनाच्या मालकालाही प्राप्त होते. मालक वाहन चालवित नसेल तरीही त्याला संरक्षण मिळविण्याचा अधिकार प्राप्त होतो. वैयक्तिक अपघात विमा केवळ मृत्यूपश्चात संबंधित वारसांना मिळतो असे नाही, तर कायमचे अपंगत्व आले तरी त्याचा लाभ घेता येतो.

आपल्या देशामध्ये अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर ‘इर्डा’ने कंपन्यांना आदेश देऊन साडेसातशे रुपयांच्या अतिरिक्त प्रीमियमवर वैयक्तिक अपघात विमा (पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स) बंधनकारक केला आहे. या पूर्वी दुचाकी तसेच खासगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी एक लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा देण्यात येत होता.

‘पर्सनल अॅक्सिडेंट प्रोटेक्शन
ग्राहकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर सध्या स्वतंत्ररित्या ‘कम्पलसरी पर्सनल अॅक्सिडेंट’ घ्यावा लागतो. सप्टेंबर २०१८मध्ये ‘इर्डा’ने सर्वप्रकारच्या मोटार विम्यांमध्ये ‘पर्सनल अॅक्सिडेंट प्रोटेक्शन’चा अंतर्भव करण्यात आला. त्या अंतर्गत गाडीचा चालक आणि मालक यांचा एकत्रित विमा १५ लाख रुपयांचा बंधनकारक असणार आहे. त्यासाठी वार्षिक प्रीमियम ७५० रुपये आकारण्याचेही आदेश देण्यात आले होते. कंपन्या साडेसातशे रुपयांपेक्षाही अधिक प्रीमियम आकारू शकतात. मात्र, विमा संरक्षण किमान १५ लाख रुपयांचे असावे, ही अट आहे. अपघातात चालक अथवा मालकाचा अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबांना १५ लाख रुपयांची भरपाई देण्यात येते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा हेतू त्यामागे आहे.