अन् YouTube वरून अचानक ‘डिलीट’ होऊ लागले इंदुरीकरांचे VIDEO

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी किर्तनाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा होत आहे. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याने इंदूरीकरांनी वैतागून किर्तन सोडून शेती करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या किर्तनाचे व्हिडीओ युट्यूबर टाकून पैसे कमावणाऱ्यांना इशाराच दिला आहे. आपल्या नावावर युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळवणाऱ्यांना धडा शिकवण्याची तयारी इंदुरीकरांनी केली असल्याचे सांगितले जात आहे. याचा धसका आता युट्यूब चॅनेलवाल्यांनी घेतला आहे. इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे व्हिडीओ डिलीट केले जात आहेत.

इंदुरीकर महाराजांचे हजारो व्हिडिओ युट्यूबर आहेत. त्यांना मिळालेले व्ह्यूज लाखोंच्या घरात आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनासाठी राज्यभर प्रवास करत असतात. अनेक जण त्यांच्या किर्तनाचे चित्रीकरण करून ते स्वत:च्या युट्यूबवर अपलोड करून लाखो रुपये कमवतात. व्हायरल झालेल्या याच व्हिडिओमुळे इंदुरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी युट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना थेट इशारा दिला. त्यामुळे युट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांनी याचा धसका घेतला आहे. अनेकांनी स्वत:हून इंदुरीकरांचे व्हिडिओ डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.

युट्यूब चॅनेल्स चालवणारे इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून लाखो रुपये कमवतात. मात्र, यातील एकही पैसा इंदूरीकर महाराजांना मिळत नाही. युट्यूबवर व्हिडिओ प्रसारीत करताना आपली परवानगी घेतली नसल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं. दरम्यान, किर्तनाचे आयोजन करणाऱ्यांच्या परवानगीने आम्ही व्हिडीओ अपलोड केल्याचे युट्यूब चॅनेलवाल्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता कारवाई कोणाविरुद्ध असा प्रश्न उभा राहिला आहे.

You might also like