नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्या दांपत्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्या दांपत्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या दांपत्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षीस होते. या कट्टरवादी दांपत्य शरण आल्यामुळे नक्षलवादी चळवळ खिळखिळी करणे सोपे जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

माओवादी विभागीय समितीचा प्रमुख दीपक उर्फ मंगरू सुकलू बोगामी आणि त्याची पत्नी मोती उर्फ राधा झूरू मज्जी या दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. हे दोघेही जहाल माओवादी असून त्यांच्यावर १४ खुनाच्या गुन्ह्यांसह ४० च्या वर गुन्हे दाखल आहेत.

जहाल माओवादी दीपक बोगामी याच्याविरुद्ध ३२ गुन्हे दाखल आहेत. तर त्याची पत्नी मोती उर्फ राधा हिच्या विरुद्ध २ खुनांसह १७ गुन्हे दाखल आहेत. नक्षलवादी चळवळीत ओढले गेल्यापासून पोलीस या दांपत्याच्या शोधात होते. त्यांच्यावर १८ लाख ५० हजार रुपांचे बक्षीस लावलेले होते. प्रत्येकी ९ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस या दोघांना पकडून देणाऱ्याला देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

हे दोघेही गुरुवारी पोलिसांसमोर हजर झाले. त्यांचं आत्मसमर्पण हे महाराष्ट्रातल्या माओवादी चळवळीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. हे दोन कट्टरवादी माओवादी शरण आल्यामुळे नक्षलवादी चळवळ खिळखिळी करणं सोपं जाईल, असं सांगण्यात येत आहे.