छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस पार्टीतील 3 जवान शहीद, 10 जखमी तर 14 बेपत्ता

रायपूर : वृत्त संस्था – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस पार्टीतील 3 जवान शहीद झाले आहेत तर 10 जवान जखमी झाले असून 14 जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांचा शोध घेण्यासाठी 150 जणांची पोलीस तुकडी घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली आहे.


छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिसांना माओवादी मोठा कट रचत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांची एक तुकडी जंगलात त्यांचा शोध घेत होती. त्यावेळी मोओवाद्यांशी त्यांची चकमक उडाली. जंगलात रात्री हा प्रकार सुरु होता. या चकमकीची माहिती मिळाल्यावर रायपूरहून जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉटर पाठविण्यात आले. रात्र व पावसाचे वातावरण असतानाही हेलिकॉटर खाली उतरविण्यात आले. त्यातून या चकमकीत जखमी झालेल्या 10 जवानांना रायपूरला आणण्यात आले. या तुकडीतील 14 जवान अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या शोधासाठी सुमारे 150 जवानांची तुकडी जंगलात घटनास्थळी पाठविण्यात आली आहे.

या हल्ल्याबाबत अजूनही वरिष्ठ पातळीवरुन कोणतीही माहिती दिली जात नाही. पुढील काही तासात या बाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.