मराठा-ब्राह्मणांना मी जय भीम म्हणायला लावले…!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दलितांवर अन्याय अत्याचार होत होता, म्हणून पँथरची निर्मिती झाली. गावोगावी दलितांची चळवळ जाऊन पोहचली तेव्हा दलितांवरचा अन्याय दूर झाला. दलितांच्या चळवळीनेच सवर्ण समाज दलितांवर अन्याय करण्यास दबकू लागला. त्यानंतर मी शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला. म्हणून मी मराठा-ब्राह्मणांना जय भीम म्हणायला लावले असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हणले आहे.

७व्या सम्यक साहित्य संमेलनात आरपीआय नेते परशुराम वाडेकर यांच्या मातोश्री लक्ष्मी वाडेकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी रामदास आठवले बोलत होते. या वेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे देखील उपस्थित होते.

कुणी मला कुत्रं मांजर म्हणले तरी मला फरक पडत नाही. प्रत्येकाला बोलण्याचे स्वतंत्र आहे म्हणून मला त्यांच्यावर टीका करू वाटत नाही . असे म्हणत रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला त्यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे. माझा आणि साहित्याचा तसा संबंध नाही मात्र माझे प्रत्येक साहित्यिकांशी संबंध आहेत. असे म्हणत, आपल्या अनोख्या शैलीत रामदास आठवले यांनी आपल्या काव्याचे वाचन केले.