ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली असून, मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलनाची वेळ ठाकरे सरकारने येऊ द्यायला नको होती. मात्र, ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ आली, असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, तामिळनाडू सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने तेथील आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पूर्ण पीठाकडे पाठवलं. दुसरीकडे ठाकरे सरकारने आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर भक्कमपणे बाजू मांडण्याची गरज होती. ते केलं गेलं नाही. म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप दानवे यांनी केला.

आरक्षणाच्या मुद्द्यावर तामिळनाडू सरकार यशस्वी तर ठाकरे सरकार अपयशी ठरले. ही स्थगिती उठवण्याबाबत ठाकरे सरकारने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, असे झालं तरच मराठा समाज शांत बसेल अन्यथा ठाकरे सरकारला या सगळ्यांचे परिणाम भोगावे लागतील, असं सुद्धा दानवे यांनी नमूद केलं.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारवर विरोधकांनी चहू बाजुंनी हल्ला चढवला. पण आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. त्याच्या न्याय हक्कांच्या लढाईत साथ देणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा विषय समोर आला तेव्हा मराठा समाजाचे विद्यार्थी आणि तरुणी यांच्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तथापि, रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like