सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मराठा उपोषण सुरूच राहणार

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवले आहे. हे आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, परंतु, जोपर्यंत मराठा आंदोलनात तरुणांवर दाखल केलेले गुन्हे सरकार मागे घेणार नाही, शहीद झालेल्या ४० जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व सरकारी नोकरी मिळत नाही, सारथी संस्थेचे कामकाज सुरू होत नाही तोपर्यंत आझाद मैदानात सुरू असलेले मराठा आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा सकल मराठा क्रांती महामोर्चाचे प्रा. संभाजी पाटील यांनी दिला आहे. आझाद मैदानात गेल्या १५ दिवसांपासून सकल मराठा क्रांती महामोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू आहे.
याबाबत प्रा. संभाजी पाटील म्हणाले की, हे उपोषण आता राज्यभरातील मराठा समाज सुरूच ठेवणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून सहकार मंत्री सुभाष देशमुख मैदानात आले होते व त्यांनी आश्वासनही दिले. मात्र, त्यानंतर काही कारवाई झाली नाही. विरोधी पक्षाचे धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही आले, त्यांच्या येण्यानेही काही फरक पडला नाही. उलट उपोषणातील आंदोलनकर्त्यांची रुग्णालयात दाखल करण्याची संख्या वाढत चालली आहे. शांततेच्या मार्गानेच आपणाला न्याय मिळणार आहे. अहिंसा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. हे मराठा समाजाने लक्षात घेत आझाद मैदानात सहभागी होत शांततेच्या मार्गाने उपोषण करत न्याय मागावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

तृप्ती देसाई विमानतळावरुनच परतल्या ; मुंबई विमानतळाबाहेरही निषेध 

या उपोषणस्थळी संतप्त महिलांनी बांगड्या फोडून सरकारचा निषेध केला. मैदानात जी रुग्णवाहिका आहे त्यात काही सोयी नसल्याने महिलांनी निषेध व्यक्त केला. शिकाऊ डॉकटर उपोषणकर्त्यांची प्रकृती तपासात आहेत, राज्य सरकार जाणीवपूर्वक असे प्रकार करत आहे, असा आरोप निशांत सकपाळ यांनी केला. मराठा नेते नानासाहेब कुटे-पाटील, राजन घाग, विपुल माने, संजय घारगे, निशांत सकपाळ, विनोद पोखरकर आदी मराठा आंदोलनकर्ते उपस्थित होते.