Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाची आज बीडमध्ये महत्वाची बैठक, काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) रद्द केला आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातर्फे निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान  मराठा आरक्षणाबाबतील पुढील रणनीती संदर्भात बीडमध्ये गुरुवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता महत्वाची बैठक आयोजित केली आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि मराठा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह विनायक मेटे  यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल.  कोरोनामुळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

उद्या होणा-या बैठकीत आरक्षण लढ्याच्या संदर्भात पुढील रणनीती आणि दिशा ठरवली जाणार आहे.  त्यानंतर राज्यभर बैठक घेणार असल्याचे मेटे यांनी सांगितले आहे.  बैठकीला मराठा समाजातील सर्व संघटना आणि महत्वाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. दरम्यान  राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यावर खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. या पत्रात खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा असे म्हटले आहे.