मराठा क्रांती मोर्चा आक्रमक ! रावसाहेब दानवे, अमित देशमुख यांच्या घराबाहेर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाचा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. वेळोवेळी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अन्याय झाल्याची भावना मराठा समाजात असून राज्य सरकार विरुद्ध मोठी नाराजी आहे. दरम्यान, आज मराठा क्रांती मोर्चा कडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरु झाली आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यापासून ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांचा समावेश आहे. अमित देशमुख, राजेश टोपे यांच्या समोर मराठा समाजातील संघटनांनी आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करत आंदोलन सुरु केले आहे.

अमित देशमुख यांच्या घराबाहेर तसेच पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. तर जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आडवण्याचा प्रयत्न झाला. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत काहींनी त्यांचा रस्ता आडवला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला केले. तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी घुसून पालकमंत्र्यांचा निषेध केला. नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याजवळ बंदोबस्त वाढवण्यात आल आहे.

आज मराठा समाजाकडून मुंबई, पुणे, नाशिक कडे जाणारा दुधाचा पुरवठा देखील रोखण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान कालच मुंबईमध्ये मराठा आरक्षणाबद्दल सर्वपक्षीय बैठक झाली असून सर्वांच्या सूचना लक्षात घेत विरोधक आणि सत्ताधारी पक्ष या प्रकरणात सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करत आहेत.