…म्हणून अण्णांच्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती बरोबरच इतर मागण्यांसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला आहे. मराठा क्रांती मोर्चा ने या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. राळेगणसिद्धी येथे हजारे यांचे आंदोलन सुरू आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी हजारे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. हजारे हे आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने आंदोलनास पाठिंबा वाढू लागला आहे. मराठा क्रांती मोर्चा ने या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती करणे, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालाला हमी भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हजारे यांचे उपोषण सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या विविध मागण्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातील मागण्यांचा समावेश आहे.

विविध प्रकल्पांसाठी शेत जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, सरसकट कर्जमुक्ती करावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या आणि अण्णा हजारे यांच्या मागण्या जवळजवळ सारख्याच आहेत. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे आणि पुढील दिशा ठरवणे यासंदर्भात राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी, समन्वयकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने केला आहे.