मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला Ultimatum, शरद पवार यांच्या बारामती येथील घरावर मोर्चा काढणार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या 2 डिसेंबरपर्यंत मार्गी लावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या बारामती येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकार आता कोंडीत सापडले आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात मराठा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता आहे
मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी (दि. 28) नाशिकमध्ये महत्वाची बैठक झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला 2 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 26 नोव्हेंबरपासून सुरू केली. यात मराठा आरक्षणाशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोवर मार्गी लागत नाही तोवर प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी मराठा वर्गाकडून केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या याच भूमिकेवर मराठा समाजात संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

You might also like