विविध मागण्यांसाठी पुन्हा मराठा समाजाचा ‘एल्गार’ ! क्रांतीदिनापासून राज्यभर ‘गनिमी’काव्याने आंदोलन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकट मागे घ्यावीत, मराठा समाजाच्या अन्य मागण्या मान्य कराव्यात तसेच कोपर्डीच्या आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी करावी या मागण्या ८ ऑगस्टपर्यंत शासनाने मान्य न केल्यास ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून राज्यभर गनिमी कावा पद्धतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

औरंगाबाद येथील यशवंत कला महाविद्यालयात आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. आज दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे. मात्र, शासनाने आपले म्हणणे मांडले नाही, तसेच वकील देखील नेमला नाही. यामुळे आरोपींच्या याचिकेवर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाने चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली आहे. परंतु ही समिती कोणतेही काम करत नाही. मराठा आरक्षण आंदोलनावर शासनाने त्वरीत निर्णय न घेत्याने ४३ तरुणांनी आत्मबलिदान दिले. यामुळे आंदोलन हिंसक झाले. यावेळी आदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत अशी मागणी अनेक दिवसापासूनची आहे. मात्र, यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही अशा अनेक मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

८ ऑगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ पासून राज्यभर गनिमी कावा पद्धतीने ठिय्या आंदोलन केले जाईल. तसेच १५ ऑगस्टपासून राज्यभर सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती रविंद्र काळे पाटील यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त