मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली ‘ही’ मोठी घोषणा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षण निकाला संदर्भात सुप्रीम कोर्टात ७ जुलैला सुनावणी होणार असल्याने, मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने २३ जुलैपासून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे. तसेच मराठा समाजाच्यावतीने आता ‘आत्मबलिदान’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली असल्याची, माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे.

काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळावरुन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४२ कुटुंबातील व्यक्ती देखील या आंदोलनात सामील होणार आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने देण्यात आला आहे.

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी…

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने अशोक चव्हाण यांनी अद्यापर्यंत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी केली. याबाबतचे लेखी निवेदन रमेश केरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तसेच राज्य सरकारने कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी काय तयारी केली आहे, असा सवालही रमेश केरे यांनी उपस्थित केला आहे.