7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकार व राज्य सरकार सामाजिक हितासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ठोस निर्णय घेऊन न्याय देत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे ७ नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यासंदर्भात बोलताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा सरकारला महागात पडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठा समजाला आरक्षण देण्याच्या मागणी साठी तुळजापुरात आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा सरकारला १५ दिवसांची मुदत दिली होती. त्याला आता २१ दिवस उलटून गेले तरी सुद्धा सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय जाहीर केला नाही. म्हणून ७ नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

एकूण २० दिवस हा मोर्चा असणार आहे. दररोज २० ते २५ किलोमीटर अंतर पार करण्यात येईल. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सदस्य सहभागी होणार आहेत. पंढरपूर ते मंत्रालय असलेला हा आक्रोश मोर्चा अकलूज, नातेपुते, बारामती, पुणे मार्गे मुंबईला जाणार आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसह अनेक मराठा आंदोलकांवरील दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.

You might also like