‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ महिलांच्या न्याय रक्षणासाठी मंत्रालयावर धडकणार

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट येथे घडलेल्या संतापजनक घटनेमुळे राज्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीवर झालेल्या अत्याचारासोबतच राज्यातील महिला व मुलींच्या न्याय रक्षणासाठी आता मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारे २७ फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

आज दारोडा येथे हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य अध्यक्ष आबासाहेब पाटील (परळी) हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पीडितेच्या कुटुंबियांकडे आले होते. सदर कुटुंबियांना मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने दिलासा देण्यात आला आहे. दरम्यान हिंगणघाट येथे झालेल्या वार्ताहर परिषदेत आबासाहेब पाटील म्हणाले की, या संदर्भातील मागण्या २६ फेब्रुवारी पर्यंत मान्य करण्यात याव्यात, जर असे झाले नाही तर २७ फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढू असे त्यांनी जाहीर केले.

या मराठा ठोक मोर्चाद्वारे पीडितेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत तर पीडितेच्या भावाला शासकीय नोकरी आणि या प्रकरणाचे आरोपपत्र लागेचच न्यायालयात दाखल करावे व प्रकरणाची तात्काळ जलद गतीने न्यायालयातुन सुनावणी करण्यात यावी, तसेच उज्वल निकम या सरकारी वकिलांना तात्काळ नियुक्ती पत्रे देण्यात यावे इत्यादी मागण्या त्यांनी केल्या आहेत. तसेच मुलींवर आणि महिलांवर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घेऊन अशा घटना संदर्भातील आरोपींना एक महिन्यात फाशीची शिक्षा सुनावण्याचा कायदा करावा, अशी देखील मागणी मराठा ठोक मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. या वार्ताहर परिषदेला संघटनेचे राज्य कार्यकारीणी पदाधिकार्‍यांसोबतच हिंगणघाटचे शरदराव शिर्के, अक्षय भांडवलकर, प्रवीण काळे यांची देखील उपस्थिती होती.

You might also like