‘मराठा समाजाला OBC कोट्यातून आरक्षण शक्य नाही’, काँग्रेसच्या मंत्र्याची आक्रमक भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही मंत्र्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आवाहन करत 52 टक्के असलेला OBC समाज हा नाराज होणार नाही याची काळजी घ्या असं म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “मराठा समाजाला ईडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय झाला. गरीब समाजाला न्याय देण्यासाठी निर्णय झाला परंतु 52 टक्के ओबीसींसाठी या विषयाची चर्चा करणं गरजेचं आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही” असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ओबीसी समाज नाराज होता कामा नये याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा असंही ते म्हणाले आहेत.

ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळ यांना निधी मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण त्याचवेळी ओबीसींवर अन्याय नको इतकीच आमची मागणी आहे असंही त्यांनी सांगितलं.

वडेट्टीवार म्हणाले, “मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही. आमची आग्रही मागणी ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको एवढीच आहे. मंत्रिमंडळातील विषय बाहेर बोलायचे नाहीत परंतु ओबीसी विषय कायमच मांडत आलो आहे” असंही त्यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.