मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण पोहचले दिल्लीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या निर्णया विरोधात आणि मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्यात यावा यासाठी राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने धरणे प्रदर्शन करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी केंद्र शासनाने तातडीने पावले टाकत आरक्षणाचा कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी, केंद्र सरकारने त्यासाठी अध्यादेश काढावा, राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती असेपर्यंत आरक्षणाच्या सवलती कायम ठेवाव्यात, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानेे मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, सुप्रीम कोर्टाने घटनात्मक खंडपीठाची लवकरात लवकर स्थापन करून तत्काळ सुनावणी सुरू करावी यासाठी केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रस्ताव दाखल करावा अशा मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. केंद्र सरकारनेे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करून 2000 कोटी रुपये निधी द्यावा आणि मराठा समाजातील बेरोजगारी निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत अशा मागण्या प्रदर्शनात करण्यात आल्या. कोरोनामुळे दिल्ली पोलिसांनी फक्त मोजक्याच लोकांना प्रदर्शन करण्याची परवानगी दिली होती असे या प्रदर्शनाचे संयोजक गंगाधर काळकुटे पाटील यांनी सांगितले.