मराठा आरक्षण : पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय आमदार-खासदारांच्या घरासमोर ‘संभळ’ वाजवून आंदोलन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावीस सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. आज (मंगळवार) पिंपरी चिंचवडमधील सर्वपक्षीय आमदार व खासदार यांच्या घरासमोर संभळ वाजवून आंदोलन करण्यात आले. या संघटनांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या घरासमोर संभळ वाजवून आंदोलन केले. यावेळी आमदार आणि खासदारांना निवेदनही देण्यात आले.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा बांधव देखील आदोलनाच्या तयारीत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटनांनी आमदार, खासदारांच्या घरासमोर संभळ वाजवून आंदोलन केले. आरक्षणाबाबत खासदारांनी संसदेत आवाज उठवावा अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मारुती भापकर म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भावना तीव्र आहेत. 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले आहे. परंतु आरक्षण मिळवून देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. हा निर्णय मराठा तरुण-तरुणींसाठी धक्कादायक आहे. कारण, शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळायला सुरुवात झाली होती. पण, या स्थगितीमुळे त्यांच्यात नैराश्य पसरले आहे. त्यामुळे आत्महत्या देखील होऊ शकतात. घटना दुरुस्ती करुन मराठा आरक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत आरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.