Maratha Reservation : ‘यांना काही झेपत नाही अन् कळतही नाही; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर राजकीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ’, असे ते म्हणाले.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत यावर टीकास्त्र सोडले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला… प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय ? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून’, असेही त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा आहे. तशी दिशा, मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता निर्णय घ्यावा, असे विनंतीवजा आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल केले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच न्यायालयाचा निकाल आरक्षणाच्या विरोधात गेला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी केली होती.