Maratha Reservation : 6 ऑक्टोबरला मातोश्री बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता मराठा आरक्षण संघर्ष समितीनं येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 6 ऑक्टोबरला मातोश्री बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीनं दिला आहे.

मंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात संघर्ष समितीनं पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं मराठा समाजाचे आरक्षण मिळालेले थांबले आहे. राज्य सरकारला येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी दिला आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितलं की, “मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणास सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर ईडब्ल्यूएसच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ द्यावा अशी भूमिका शासनानं आधी घेतली होती. परंतु त्याबाबत मतभेद आहेत.”

सर्व सवलती देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात येणार नाही. मात्र ईडब्ल्यूएसच्या सर्व सवलती देण्यात येतील असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला.