Maratha Reservation : फडणवीसांचा NCP वर गंभीर आरोप; म्हणाले – ‘मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादीने स्पॉन्सर्ड केल्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून निशाणा साधला. ‘मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पॉन्सर्ड केल्या आहेत’, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, की ‘राज्य सरकारने निष्काळजीपणा दाखवल्यामुळे हाती निराशा आली. राष्ट्रवादीच्या काही लोकांनी यापूर्वी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. त्यांच्या काही लोकांशी बैठकाही झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली तेव्हा फडणवीसांची आठवण झाली. त्याआधी चर्चेला बोलवले नाही. आम्ही कायदा न्यायालयात टिकवला होता. पण हे लोक टिकवू शकले नाहीत. आम्ही योग्य समन्वय साधून मराठा आरक्षण कायदा टिकवला असता, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी फडणवीस जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे. याच्या प्रत्युतरात फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला. राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या, असे ते म्हणाले.