Maratha Reservation : अशोक चव्हाणांचा भाजपला सज्जड दम, म्हणाले – ‘पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) रद्द केला आहे. या निकालानंतर भाजपातील काही मंडळी मराठा समाजाची माथी भडकावत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आणणारा पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका, अशा शब्दात मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांना सज्जड दम दिला आहे. तसेच मराठा समाजाने विरोधकांच्या भूलथापा व अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, 102 वी घटना दुरूस्ती आणि गायकवाड आयोगाच्या अहवालात मराठा समाजाची अपवादात्मक व असाधारण परिस्थिती दिसून येत नसल्याचे सांगून न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. परंतू काही मंडळी समाजाला चुकीची माहिती देत माथी भडकावत आहेत. न्यायालयाचा निकाल विरोधात गेला असलातरी आरक्षणाची लढाई संपलेली नाही. केंद्रीय मागास वर्ग आयोगामार्फत राष्ट्रपतींकडून मराठा आरक्षणाला मान्यता मिळवण्याचा मार्ग न्यायालयाने दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा अभ्यास केला जात आहे. येत्या दोन दिवसात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार असून त्यात पर्यायाबाबत चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच तत्कालीन भाजप सरकारला श्रेय मिळू नये म्हणून मराठा आरक्षण कायदा टिकवण्यात आला नाही, या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानालाही चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. भाजपला श्रेय मिळेल, अशी भीती असती तर हा कायदा तयार करताना आम्ही तत्कालीन सरकारला एकमुखी पाठिंबा दिला नसता. भाजपलाच श्रेयच हवे असेल तर त्यास आमची काही हरकत नाही. आताही त्यांनी केंद्राच्या मदतीने केंद्रीय मागास आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडून हा कायदा मंजूर करून घ्यावा आणि संपूर्ण श्रेय घेऊन जावे असा टोला चव्हाणांनी फडणवीसांना लगावला आहे.