मराठा आरक्षण : घटनापीठासमोर ९ डिसेंबरला सुनावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करून सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले आहे. या संदर्भात पाच सदस्यीय घटनापीठासमोर ९ डिसेंबरला दुपारी २ वाजता सुनावणी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटद्वारे दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती राज्य शासनाचे वरिष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती. त्या वेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले होते. परंतु, अद्याप यासंदर्भात निर्णय झालेला नव्हता. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने २० सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारे चार अर्ज दाखल करण्यात आले होते. एवढेच नाही तर रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकताही विशद केली होती.

अखेर राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, ९ डिसेंबरला पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.