उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण हे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे. यात सर्वच राजकीय पक्षांचा स्वार्थ लपलेला असून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मराठ्यांची दिशाभूल करण्यासाठी घेतलेला राजकीय निर्णय आहे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.
उमरगा नगर पालिकेच्या सभागृहात मराठा सेवा संघाच्या वतीने संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, विभागीय अध्यक्ष लिंबराज सुर्यवंशी, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, अरविंद चौधरी आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना खेडेकर म्हणाले, मराठवाडा वगळता इंग्रजाच्या काळापासून विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात असलेले मराठे हे कुणबी आहेत. त्यामुळे ज्या मराठ्यांनी कुणबी असलेली दाखले काढले आहेत. त्यांना ओबीसींचे सर्व आरक्षण लागू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, भास्कर वैराळे, डॉ. श्रीनिवास जाधव, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. विनोद जाधव, डॉ. कोमल गरड, गजानन जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष कैलास शिंदे, आरपीआयचे अध्यक्ष सुभाष सोनकांबळे, अनिल सगर, जिजाऊ ब्रिगेडच्या ताई बोराडे, सुनंदा माने, मोहन जाधव, रेखा सुर्यवंशी,ज्योती कावळे आदी उपस्थित होते.
बावणे कुणबी समाजातील मान्यवरांचा गौरव
नागपूर : बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामे करणाऱ्या मान्यवरांचा समाजभूषण व कृषिभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
रामनगर, नागपूर येथील बावणे कुणबी समाज सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक रत्नाकर ठवकर (अध्यक्ष, श्रीक्षेत्र अंभोरा देवस्थान) हे होते.तर, समाजभूषण बी. के. ठवकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. आमदार डॉ. परिणय फुके, माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार मोहन मते, डॉ. हरीश धुरट, राजू भोतमांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. फुके म्हणाले, सर्व समाजबांधवांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन समाजासाठी कार्य करण्याची गरज आहे. सकल कुणबी समाज हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा करण्याची गरज असल्याचेही फुके यांनी नमूद केले.