‘या’ कारणामुळं मराठा मोर्चानं सरकारच्या भूमिकेवर व्यक्त केला संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाबाबतच्या खटल्याचे दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात नोटींग होते. मात्र या नोटींगला वरिष्ठ विधीतज्ञ मुकूल रोहतगी हे अनुपस्थित राहिल्याने मराठा मोर्चाने सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला आहे. नवीन सरकार स्थापनेनंतर जुनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त झाली आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत. लवकरात लवकर नवीन सरकारच्या उपसमितीची स्थापना व्हावी यासाठी मराठा मोर्चा आग्रही आहे.

राष्ट्रपती राजवटीच्या काळात लवकर वकील उपलब्ध करुन दिले नाही आणि उपलब्ध करुन दिलेले वकील न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपस्थित राहात नाही, यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील सरकारबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती.

मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी यासारख्या वकिलांना बदलण्यात आले आहे ? आणि हे जर खरे असेल तर अशा जेष्ठ वकिलांना बदलण्याचे कारण काय असा सवाल देखील यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्याला संपर्क करून मराठा आरक्षणाबाबत कोणतीही कसूर केली जाणार नाही असा विश्वास दिला त्यामुळे मी समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानतो असे संभाजीराजे यांनी म्हंटले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/