मेगाभरती प्रक्रिया सुरू राहील परंतु २३ जानेवारीपर्यंत नेमणुका नाही

मुंबई : वृत्तसंस्था – राज्यसरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मेगाभरती बाबतची महत्त्वपूर्ण माहिती आज मुंबई उच्च न्यायालयात दिल्याचे समजत आहे. या माहितीनुसार, मराठा आरक्षण कायद्यांतर्गत राज्यात मेगाभरती सुरू राहणार आहे. परंतु  मेगाभरतीत यशस्वी झालेल्या मराठा आरक्षणातील (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग) यशस्वी उमेदवारांना २३ जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात येणार नाही अशी हमी  राज्यसरकारनं कोर्टाला दिली आहे.

आज कोर्टात  मराठा आरक्षणावरील सुनावणी होती. यावेळी आरक्षणावरील सुनावणी दरम्यान राज्यसरकारनं कोर्टात ही हमी दिली आहे. कोर्टाने सुनावणीदरम्यान  राज्य सरकारकडे मेगाभरतीबाबत विचारणा केल्याचे दिसून आले. यावर स्पष्टीकरण देताना, मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत मेगाभरती प्रक्रियेत राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्था भरती प्रक्रिया सुरू करू शकतील. मात्र २३ जानेवारीपर्यंत यशस्वी उमेदवारांना नेमणूक पत्र देता येणार नाही असं राज्य सरकारकडून सांगणयात आलं आहे. इतकंच नाही तर  या अनुषंगाने राज्य सरकार सर्व संस्थासाठी निर्देश देणारे परिपत्रक किंवा जीआर काढेल, असं राज्य सरकारने कोर्टात स्पष्ट केल्याचं दिसून आलं. दरम्यान कोर्टाने राज्य सरकारच्या या हमीची नोंद घेतली आहे. मुख्य म्हणजे आता या प्रकरणावर पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार असल्याचे समजत आहे.

याचबरोबर, एका आठवड्यात मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या संपूर्ण अहवालाची प्रत सीलबंद स्वरूपात देण्यात येईल. मात्र, अहवाल सर्व याचिकादार व प्रतिवादींना पूर्णपणे न देता, गैरलागू भाग वगळून अंशतः देता येईल, असे सांगण्यात आले.

अॅड. गुणरत्न सदावर्ते  यांनी यांनी मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.