मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी सत्ताधारी-विरोधक पेटले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाचा दिवस असून याचिकांची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आभासी कोर्टामध्ये सुनावणी सुरू असून याचिकाकर्त्यांनी आरक्षणाची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अशात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटल्याचे दिसून आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकार अजूनही गंभीर नाही. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना सरकारच्या वकीलांमध्येच समन्वय पाहायला मिळत नाही असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता सरकार गंभीर नसल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी फेटाळला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते सरकार करत असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे. आम्ही सगळ्या मराठा संघटनांशी, वकीलांशी चर्चा करत आहोत. मराठा आरक्षणाबाबत काही जणांनी राजकारण सुरु केले आहे. हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे. पण जण राजकीय मतलब साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप थोरात यांनी केला आहे.