Maratha Reservation : मराठा आरक्षणाप्रश्नी भाजपच्या खासदारांचं छत्रपती संभाजीराजेंना साकडं !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –   मराठा आरक्षणासंबंधित भाजपच्या तरुण खासदारांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणांसंबंधीत मार्ग काढावा अशी विनंती या खासदारांनी केली.

नगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारानं दिल्लीत भाजपच्या खासदारांचे शिष्टमंडळ संभाजीराजेंना भेटलं. यात खासदार रक्षा खडसे, खासदार डॉ प्रीतम मुंडे, खासदार डॉ भारती पवार, खासदार डॉ हीना गावित, खासदार उन्मेष पाटील यांचा समावेश होता.

या भेटीबद्दल खासदार विखे यांनी सांगितलं की, “मराठा आरक्षणामुळं मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. हा प्रश्न समाजाच्या जिव्हाळ्याचा असल्यानं त्यावर लवकर आणि योग्य तोडगा निघणं अपेक्षित आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली तर काही सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास वाटतो. त्यामुळं आम्ही ही भेट घेतली. संभाजी महाराजांनी यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.”

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता मराठा समाजातून संतप्त भावना व्यक्त होताना दिसत आहेत. यासाठी आंदोलनंही सुरू झाली आहेत. अनेक संघटनांकडून सरकार आणि राजकीय पक्षांना इशाराही देण्याता आला आहे. छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले या दोघांनीही या प्रश्नात लक्ष घातलं आहे. उदयनराजेंनी अलीकडेच आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.