मराठा आरक्षण : तरुणाचा Facebook Live करून आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारी सुनावणी आता 5 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. सुनावणी लांबल्याने मराठा समाजात पुन्हा एकदा असंतोष वाढू लागला आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा संघटनांचे आंदोलन सुरू असून, या ठिकाणी मराठा समाजातील एका तरुणाने बुधवारी (दि. 20) विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरुणाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

दत्ता भोकरे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने तीव्र आंदोलन करून मुक मोर्चे काढल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र सध्या हे आरक्षण न्यायालयीन लढाईत अडकले आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. दरम्यान औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्या ठिकाणी दत्ता भोकरे याने फेसबूक लाइव्ह करत मराठा आरक्षाची मागणी केली आणि विषप्राशन केले.